साळवी स्टॉप येथे इमारतीमधील दोन इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या भक्षस्थानी

रत्नागिरी:- शहरात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरात असलेल्या ‘डॅफोडिल हाईट्स’ या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत दोन दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

साळवी स्टॉप येथील ‘डॅफोडिल हाईट्स’ इमारतीच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे गाड्या पार्क केलेल्या होत्या. यावेळी अचानक एका इलेक्ट्रिक दुचाकीमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने भीषण पेट घेतला. ही आग इतकी वेगाने पसरली की, बाजूलाच पार्क केलेल्या अन्य दोन दुचाकींनाही याची मोठी झळ बसली.

या आगीच्या तावडीत सापडलेल्या दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने, ज्यावेळी आग लागली, त्यावेळी पार्किंगमध्ये काही चारचाकी गाड्या देखील उभ्या होत्या. प्रसंगावधान राखून या चारचाकी गाड्या तातडीने तेथून हलवण्यात आल्या, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. जर या चारचाकी गाड्यांना आग लागली असती, तर आगीचे स्वरूप अधिक भीषण झाले असते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. इलेक्ट्रिक दुचाकीला आग नेमकी कशामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे की बॅटरीच्या अतिउष्णतेमुळे याचा तपास आता केला जात आहे.