रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील रॉयल कॉर्नर बेकरीत शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. बेकरीतील फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीत बेकरीतील माल पूर्णतः जळून खाक झाल्याने बेकरी मालकाचे पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप येथील रॉयल कॉर्नर बेकरीत आग लागल्याचे निदर्शनास आले. बेकरीतील फ्रीज मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बेकरीत आग लागली असे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले. सुरुवातीला बेकरीतुन धूर येत होता अवघ्या काही मिनिटांत बेकरीतुन आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.
बेकरीत आग लागल्याची माहिती येथील नागरिकांनी रनपच्या अग्निशमन यंत्रणेला दिली. तसेच बेकरीचे मालक सुरेशकुमार नायर देखील घटनास्थळी दाखल झाले. रत्नागिरी नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. तब्बल दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रनपच्या अग्निशमन यंत्रणेतील वाहन चालक नरेश सुर्वे, फायरमन ज्ञानदेव शिंदे आणि श्री. मुंढे यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत बेकरी मालकाचे 15 लाखांचे नुकसान झाले आहे.