रत्नागिरी:- महामार्गावर उभ्या झालेल्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले जाणार नाही. लवकरच या बांधकामांवर जेसीबी फिरवला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या ८ दिवसात साळवी स्टॉप ते कुवारबांवदरम्यान उभ्या राहिलेले बांधकाम जेसीबीने पाडून टाका असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
कोकणात एखादा प्रकल्प येणार अथवा एखादा महामार्ग होणार असल्याची कुणकुण लागताच जमिन खरेदीचे व्यवहार लागलीच सुरू होतात तर ज्या ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे त्या ठिकाणी रातोरात अनधिकृत बांधकामे उभी राहतात याचे कारण शासनाकडून मिळणारा मोबदला आहे.
यापूर्वी जेवढे प्रकल्प आले त्या प्रकल्पांना ४ पट ते ५ पट जमिनीचा मोबदला मिळाला होता. महामार्गावर असलेल्या वडापावच्या गाडीला सोन्याचा भाव आला होता. त्यामुळे नवा रस्ता होणार अशी घोषणा झाली की लागलीच रातोरात अनधिकृत बांधकामे उभी होतात. रत्नागिरीतदेखील हे चित्र सध्या पहायला मिळत आहे.साळवी स्टॉप ते कुवारबांव व साळवी स्टॉप ते चर्मालय या प्रस्तावित मिर्या-नागपूर महामार्गावर सध्या अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. सध्या या ठिकाणी रस्त्यालगत टिचभर जागादेखील शिल्लक राहिलेली पहायला मिळत नाही. रातोरात पत्र्याच्या शेड मारून या ठिकाणी बांधकामेदेखील केली जात आहेत. या विरोधात काही दिवसांपूर्वी रत्नागिरीकरांनी आवाज उठविला. रत्नागिरीची ओळख पुसण्याचा प्रयत्न काही तथाकथित करत असल्याचा आरोपदेखील झाला होता. त्यावेळी ना. सामंत यांनी प्रशासनाला अशा प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अनधिकृत बांधकामाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी प्रशासनाने येथील बांधकामे पाडण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. लवकरच पोलीस बंदोबस्त घेऊन ही सर्व बांधकामे जेसीबीने उद्ध्वस्त केली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.









