साळवी स्टॉप ते कुवारबाव मार्गावरील अतिक्रमण हटवणार

 100 जणांना नोटिसा; चार दिवसात कारवाई 

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गानजिक साळवीस्टॉप ते कुवारबाव या भागात अनधिकृत बांधकामासह फेरीवाले, खोके, टपऱ्यानी परिसर व्यापला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना अनधिकृत साम्रज्याचे दर्शन घेऊनच आत प्रवेश करावा लागत आहे. रस्त्यानजिक पक्के बांधकाम होत असल्याने याची दखल राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यालय कोल्हापूरने घेतली  आहे. महामार्गानजिक असलेल्या अनधिकृत बांधकाम करणार्या १०० जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. चार दिवसात अनधिकृत बांधकाम, खोके, टपऱ्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साळवीस्टॉप ते कुवारबाव या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा खोके, टपऱ्या यासह दुकानांसाठी पक्की बांधकामे केली जात आहेत. टीआरपी ते कुवारबाव चौक येथे रस्त्याच्या बाजुला असलेल्या शासकीय जागेत अनधिकृत दुकान गाळयांसाठी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. स्थानिक संस्थांचा याला आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे. एकाच लाईनमध्ये सरसकट अनधिकृत गाळयांचे बांधकाम सुरू झाल्याची दखल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग जमीन व रहदारी अनियम २००२ (२००३चे १३) च्या कलम २६ मधील पोटकलम ६ अन्वये नोटीस बजवण्यात आले आहे. अनधिकृत बांधकाम, खोके, टपर्या तीन दिवसांच्या आत काढून टाकण्याचे आदेश प्रकल्प संचालकांनी दिले आहेत. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा  इशारा प्राधिकरणाने दिला आहे.   

स्थानिक ग्रामपंचायतींनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला अनधिकृत बांधकामाबाबत लेखी पत्र दिल्यानंतर प्राधिकरणाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. परंतु प्राधिकरणाच्या जागेत असलेल्या अनधिकृत खोके, टपर्यांची करपावती स्थानिक संस्था कशा वसूल करतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खोकेधारकांनीही आमची करपावती कशाच्या आधारे घेतली जात होती असा प्रश्न निर्माण केला आहे.
रत्नागिरी शहरापाठोपाठ शहरानजिकच्या मुख्य रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या काढण्यात येणार आहेत. तीन दिवसात स्वतःहून टपऱ्या न काढल्यास प्राधिकरण कारवाईची मोहीम हाती घेणार आहेत.