सार्वजनिक रस्त्यावर अडथळा; चालकावर गुन्हा दाखल

मंडणगड:- वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा धोकादायक स्थितीत वाहन उभे केल्याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिसांनी एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन कायद्यानुसार म्हणजेच ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलम २८५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

महम्मद साब इशामुद्दीन ओबिलकर (वय ६५, रा. शिवाजीनगर, मंडणगड) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास आरोपीने आपल्या ताब्यातील इको चारचाकी वाहन (क्रमांक: MH 08 OG 2762) मौजे वेसवी नाका येथील सार्वजनिक रस्त्यावर उभे केले होते. हे वाहन अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता. ही बाब धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आजर हमीद शेख (७८६) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे.