साथींच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चाकरमान्याची होणार तपासणी

१६ सप्टेंबर पासून २३ ठिकाणी आरोग्य पथके होणार तैनात

रत्नागिरी:- डेंग्यूसह ताप, डोळे येणे याचे रुग्ण मुंबईत मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गणेशोत्सवात मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावाला येणार असल्याने या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून २३ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ताप, काविळ, गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया रुग्ण आढळल्यास औषधोपचार करण्यात येणार आहेत. गणेशाेत्सवाच्या काळात गावी येणाऱ्या नागरिकांमुळे आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आराेग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे आराेग्य विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी आराेग्य पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके नेमून दिलेल्या ठिकाणी तैनात राहणार असून, गावी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणार आहेत.

जिल्ह्यात गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू होणार आहे. महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता असते. त्यावेळी प्रवाशांना वैद्यकीय मदत भासू शकते. हे लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, औषध निर्माता ही सेवा देणार आहेत. महामार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. तसेच गणेशभक्तांना वैद्यकीय सेवेची कुठेही कमतरता भासणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार आहेत. औषधांचा साठाही पुरेसा ठेवण्यात येणार आहे.