सात भाऊ एकवटले अन् फुलला केळी, अननसचा मळा

सांगवेतील शेलार बंधु; सर्वाधिक सेंद्रीय खतांचा वापर

रत्नागिरी:- विभक्त कुटूंब पध्दतीला फाटा देत सांगवेतील (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) शेलार कुटूंबातील सात भावांनी एकत्र येऊन केळी, अननस आणि कलिंगडाची यशस्वीपणे लागवड करत शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण केला आहे. कुटूंब एकत्र येऊन शेती करु लागले की त्याचे फायदेही अधिक मिळतात आणि रोजगारावरील खर्च कमी होतो हा मंत्र शेलार बांधवांनी अन्य शेतकर्‍यांपुढे ठेवला आहे.

सांगवेतील शेतकरी मिलींद शेलार यांच्या परिवारात सख्खे बंधू रवींद्र शांताराम शेलार, हेमंत शांताराम शेलार, चंद्रकांत शांताराम शेलार आणि चुलत बंधू संदिप विष्णू शेलार, बाळूजी विष्णू शेलार, दिलीप विष्णू शेलार हे आहेत. गावात त्यांची वीस एकर सामाईक जमिन. मिलिंद वगळता अन्य सर्व भाऊ आणि त्यांची कुटूंबे मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्याला. सणासुदीला चाकरमानी गावाकडे येऊन राहायचे. मुंबईतील शेलार बंधूच्या कानावर अनेक शेतीविषयक संकल्पना येत होत्या. 2010 साली सणानिमित्त आलेल्या शेलार बंधूनी फळबागायतीकडे वळण्याबाबत विचारविनिमय सुरु केला. चिपळूणमधील दिपक शिंदे यांच्या यशस्वी केळी प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली अन् निर्णय झाला. मुंबईतील भावांनी आर्थिक तर गावात वास्तव्याला असलेल्या मिलिंद यांनी बागायतींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्विकारली. कोकणातील नवी पिढी विभक्त कुटूंब पध्दतीकडे वळलेली आहे. भावाभावांमध्ये जागांवरुन तंटे-बखेडे निर्माण होताना दिसतात; मात्र समन्वय साधला गेला तर एकीचे बळ मिळते फळ या उक्तीला अनुसरुन फायदाही होतो.

केळी लागवड करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर सातपैकी सहा भावांनी दहा लाख रुपये समप्रमाणात काढले. पहिल्या वर्षी वीस एकरवर केळीची लागवड केली. त्यावर्षी अडीचशे टन उत्पादन मिळाले. त्यानंतर अडीच एकरवर अननस आणि एक एकरवर कलिंगड लागवड केली. पुढे गवारेड्याच्या त्रासामुळे केळीची लागवड कमी केली. सध्या त्यांच्या शिवारात अडीच एकरवर जी 9 जातीच्या केळीची लागवड केलेली आहे. यामधून त्यांना मिळणारे उत्पन्न सात भाऊ वाटून घेतात. होळी, शिमगा, दिवाळीच्या सुट्टीत शेती, बागायतीच्या कामात हातभार लावण्यासाठी सातही भाऊ एकवटतात. बागायतीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी दीड किलोमीटर अंतरावर सप्तलिंगी नदीमधून त्यांनी पाणी आले.