रत्नागिरी:- जिल्ह्यात चार नगर परिषद व तीन नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून सात थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवकपदांसाठी तब्बल 461 उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी शिवसेना-भाजप विरोधात उबाठा तर काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होत आहेत. 26 नोव्हेंबर रोजी अपक्षांना चिन्ह वाटप होणार असल्याने या दिवशी खर्या अर्थाने निवडणुकीची रंगत रंगणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 15 जणांनी अर्ज मागे घेतले. यात बंडाचा झेंडा फडकवणार्या भाजपाच्या चारजणांचा समावेश आहे. एकूण 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून थेट नगराध्यक्षपदासाठी सहा तर 32 नगरसेवकपदांसाठी 101 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार आहेत. भाजप-शिवसेना विरोधात उबाठा अशी लढत विशेष करून रत्नागिरीत रंगणार आहे.
चिपळूण न.प.च्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणात राहिले आहेत तर 28 जागांच्या नगरसेवक पदासाठी तब्बल 110 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 12 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता चिपळूण नगरपालिकेची निवडणूक बहुरंगी होणार आहे. तर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली असून शिंदे सेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुधीर शिंदे नाट्यमयरीत्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमात अर्ज माघारीच्या अंतिम दिनी शुक्रवारी 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे नगराध्यक्षपदासाठी 5 व नगरसेवक पदासाठी 65 असे एकूण 70 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या दीक्षा खंडागळे यांनी आप या पक्षाकडून व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते. यातील अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी मृणाल शेटये (भाजपा), स्मिता लाड (अपक्ष), सबुरी थरवळ (उबाठा), वेदिका मोरे (अपक्ष) यांच्यात सरळ लढत होणार आहे.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी सात उमेदवारांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी तीन तर दहा प्रभागातील वीस जागांसाठी 51 असे एकत्रित 54 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत . लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह सर्व प्रभागातील लढातींचे चित्र स्पष्ट झाले असून अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत होणार असून एकूण वीस जागांमध्ये अकरा जागी तिरंगी तर नऊ जागी दुरंगी लढत होणार आहे.
लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा आखाडा चांगलाच रंगतदार होऊ लागला आहे. प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. निवडणूक यंत्रणेकडे दाखल झालेल्या एकूण 87 उमेदवारी अर्जांपैकी 74 वैध तर 13 अर्ज अवैध ठरले होते. त्यामधून गुरुवार व शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत एकूण 12 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून 62 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी 3 तर दुसर्या दिवशी 9 असे एकूण 12 अर्ज उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
यामध्ये प्रभाग क्रमांक 1- मुग्धा मनोज चांदोरकर, प्रभाग क्रमांक 3- स्मिता हरिश्चंद्र मांडवकर, प्रभाग क्रमांक 5- अशोक महादेव कातकर, प्रभाग क्रमांक 6- प्रमोद मनोहर कुरूप, प्रभाग क्रमांक 8- सुजित यशवंत भुरके, प्रभाग क्रमांक 8- मंगेश मनोहर लांजेकर, प्रभाग क्रमांक 9- सुहेल आदम मापारी, प्रभाग क्रमांक 13- फरजीन आदाम मापारी, प्रभाग क्रमांक 14- भालचंद्र तानाजी कांबळे, भाग क्रमांक 16- केशव गुणाजी गुरव, प्रभाग क्रमांक 17- मेघा महेश सुर्वे यांसह नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केलेल्या चेतना भालचंद्र कांबळे यांनी आपला अर्ज मागे घेतला.
बारा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 62 उमेदवार स्वतःला अजमावणार आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी एकूण 57 उमेदवार असे एकूण 62 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकिला सामोरे जाणार आहेत. यावेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांचा भरणा जास्त असल्याने अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे डोकेदुखी ठरण्याची दाट श्यक्यता आहे. त्यामुळे एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु असताना दुसरीकडे अपक्षांचे राजकीय दावेदारांना जोर का झटका देण्याच्या जोरदार आव्हान देत आहेत.
गुहागर नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून नगरसेवक पदासाठी 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे येथील निवडणूकीतून एकूण 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली. गुहागरमध्ये 4 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर 40 उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात आहेत.
खेडमध्ये नगराध्यक्ष निवडणूक तिरंगी
खेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता चरमसीमेवर पोहोचली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाच्या घडामोडींनी निवडणूक समीकरणात मोठेच बदल घडवले आहेत. न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 21 अर्ज बाद झाल्यानंतर 69 उमेदवार रिंगणात उरले होते. मात्र, अंतिम दिवशी 19 उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेरीस 50 जणांची नावे रिंगणात कायम राहिली आहेत. नगराध्यपदाची निवडणूक तिरंगी होणार असून नगरसेवकपदासाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना उमेदवाराचा रस्ता सुलभ झाला आहे.
रत्नागिरी, चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदाच्या लक्षवेधी लढती
यावेळी जिल्ह्यात रत्नागिरी तसेच चिपळूण या दोन ठिकाणच्या नगराध्यक्षदाच्या निवडणुका या जिल्हावासीयांसाठी अत्यंत लक्षवेधी ठरल्या आहे. यापैकी रत्नागिरीमध्ये शिल्पा सुर्वे (शिवसेना) तसेच तसेच शिवानी माने-सावंत (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्यात नगराध्यक्षदाकरिता लढत होणार आहे तर चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम, शिवसेनेचे उमेश सकपाळ तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजू देवळेकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.









