रत्नागिरी:- तालुक्यातील साठरे बांबर ठोंबरेवाडी गावातील तीन वाड्यांतील घरानजीक असणा-या डोंगराला गेले काही दिवस या भागात सातत्याने जोराने पाऊस होत असल्याने भेगा गेलेल्या असून जमिन खचण्याची व दरड कोसळण्याचीही शक्यता असल्याने तेथील ग्रामस्थांना ग्रामपंचायत साठरे बांबर व पाली महसूल मंडळ, तलाठी सजा यांनी पाहणी करुन खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सुचित केले आहे. यामुळे गावातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
याबाबत साठरे बांबर ग्रा.पं. चे सरपंच वामन कांबळे यांनी माहिती देताना सांगितले की, आमच्या ठोंबरेवाडी या गावातील शिंदेवाडी, ब्राम्हणवाडी, लावगणवाडी या ठिकाणी असणा-या नागरीवस्ती नजीकच्या डोंगराला काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. गेले काही दिवस सातत्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे त्यानुसार संबंधितांना खबरदारीच्या सुचना देऊन सुचित केले आहे. यावेळी येथील स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती दिली आहे.
तसेच याबाबत वळके सजा तलाठी मीनाक्षी कदम यांनी सांगितले की, ठोंबरेवाडी येथे तीन वाड्यांनजीक असणार्या डोंगराला भेगा गेलेल्या असल्याने नैसर्गिक आपत्ती घडण्याचा संभव असल्याने या परिसरात ग्रामस्थांनी जाऊ नये तसेच गुरे चरवण्यास नेऊ नयेत. असे सूचित करण्यात आले आहे. याठिकाणी डोंगराच्या पायथ्याला नागरीवस्ती आहे त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे सांगितले.
ठोंबरेवाडी गावातील तीन वाड्यांनजीक असणा-या डोंगराला भेगा पडून दरड कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील १५० घरांना कोविड-१९ चे नियम पाळून सभा घेऊन सुचित करण्यात आले आहे. याबाबतीत प्रत्यक्ष पाहणीसाठी पाली महसूल मंडळ अधिकारी , वळके सजा तलाठी मिनाक्षी कदम, उपसरपंच संजय तेरेकर, ग्रामसेविका सौ. कोकरे, ग्रा.पं.सदस्य प्राची सावंत, विजय बारगुडे, प्रार्थना ठीक, ग्रामस्थ नरेश रसाळ, वसंत ठोंबरे, जर्नादन पंडीत यावेळी उपस्थित होते. यामुळे येथील नागरीक भितीच्या वातावरणात आहेत.