रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील ६ बेटांवर तिरंगा फडकवून सागरी सुरक्षेचा संदेश दिला. विशेष म्हणजे, दापोली येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याचा उद्देश डीजीपी – आआयजीपी परिषद २०२४ मध्ये मा. पंतप्रधानांनी सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी राज्यातील निर्जन बेटांवर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण व रात्र वास्तव्याचे निर्देश पोलीस दलाला दिले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिसांनी हा विशेष उपक्रम राबविला. जिल्ह्यात एकूण १५ बेटे असून त्यातील १३ बेटे निर्मनुष्य आहेत.
जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ला (बेट): हर्णे, दापोली, बाबा मलंग दर्गा खेड, जुवाड पेठ बेट: गोवळकोट, चिपळूण, जुव्याचे पेंद: कुरधुंडा, संगमेश्वर, जुवे बेट: बुरंबेवाड, नाटे आणि वाकडवन: कोंडसर, नाटे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
सुवर्णदुर्गावर उत्साह
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर झालेल्या मुख्य सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, अश्वनाथ खेडकर व इतर अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेत मत्स्य विभाग, बंदर विभाग, पोलीस पाटील, माजी सैनिक आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे सागरी सीमांवरील पोलीस दलाची नजर अधिक सतर्क झाली असून, दुर्गम बेटांवरील या ध्वजारोहणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.









