सागरी महामार्ग काळबादेवी समुद्रातून फ्लायओव्हरने जोडणार

ग्रामस्थांची एकमुखी मंजुरी, लवकरच कामाला सुरुवात

रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गाला रत्नागिरीतील काळबादेवी येथे येत असलेला मोठा अडथळा आता दूर झाला आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित आखणीला तीव्र आक्षेप घेतला होता, मात्र आता काळबादेवी येथून समुद्रातून फ्लायओव्हरने हा महामार्ग नेण्यास ग्रामस्थांनी एकमुखी मंजूरी दिली आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी महामार्गाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सागरी महामार्गावरील रत्नागिरीतील काळबादेवी ते आरे-वारे या पाच किलोमीटरच्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण केले होते. सुरुवातीला काळबादेवी गावातून रस्त्यासाठी दोन पर्याय ठेवण्यात आले होते, ज्यात शेतजमीन आणि काही घरे बाधित होण्याची शक्यता होती. याला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता आणि किनाऱ्यावरून आरे-वारेपर्यंत मार्ग नेण्याची सूचना केली होती.

ग्रामस्थांनी सुचवलेली आखणी सीआरझेड-1 ए झोनमधून आणि वन विभागाच्या जागेतून जात असल्याने आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पर्यायी आखणीचा सविस्तर अहवाल देणे गरजेचे होते. तसेच, काळबादेवी येथील खाडीवरील पुलाचे बांधकाम निश्चित होऊन निविदा प्रक्रिया सुरू असतानाही, फ्लायओव्हरला ग्रामस्थांचा 100% विरोध होता.

यावर तोडगा काढण्यासाठी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी आणि ग्रामस्थ यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनुसार, काळबादेवी येथील दर्गा ते आरे-वारे पुलापर्यंत समुद्रमार्गे फ्लायओव्हर नेणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले.

हा फ्लायओव्हर पिलरवर बांधकाम करून तयार केला जाईल. यामुळे कोणाही ग्रामस्थांची घरे व इतर जागा बाधित होणार नाहीत आणि गावातील किनाऱ्यावरील जागांनाही बाधा पोहोचणार नाही. खासगी जागा बाधित झाल्यास योग्य मोबदला दिला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. किनाऱ्यावरील या फ्लायओव्हरला लँडिंग पॉईंटही दिले जाणार आहेत. हा फ्लायओव्हर आरे-वारे ते मिऱ्या असा जोडण्यात येणार आहे.

या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर योग्य तोडगा पडल्याने उपस्थित ग्रामस्थांनी महामार्गाच्या कामाला सहमती दर्शवली. या बैठकीला बापू गवाणकर, माजी सरपंच विनय मयेकर, दिलीप भुते, गजानन मयेकर, प्रफुल्ल पेटकर, सुहास पेटकर, प्रतीक नार्वेकर, संदेश बनप, माजी सरपंच जितेंद्र जोशी, प्रमोद मयेकर, दिलीप जोशी, संतोष मयेकर आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.