खासदार तटकरे; ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे तयार करण्याचे काम
रत्नागिरी:- सागरी महामार्गासाठी 12 हजार कोटीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही महामार्गाला शक्य तिथे एकत्रित करून ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशीच चर्चा सुरू आहे. यातून पर्यटन वाढीला मोठी मदत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्ग टोल आकारणी केली जाऊ नये, हा मार्ग टोलमुक्त मार्ग असावा यासाठीही आमचे प्रयत्न सुरू, असल्याचे त्यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्य अजय बेरवटकर राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकस आघाडीचे सरकार आले. त्यानंतर या सरकारने सागरी महामार्गासर, दोन मेडिकल कॉलेज, मच्छीमारांचे प्रश्न सोडविले. पर्यटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महामारीमुळे शासन मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यात केंद्र सरकार राज्य शासनाची कोंडी करत आहे. जीएसटीच्या माध्यमातून राज्याला मिळणारा निधी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यात भर म्हणून निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणाला बसला. या अडचणीच्या काळात शासनाने कोकणाला 600 कोटीची भरभरून मदत केली. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत सागरी महामार्गाच्या 12 हजार कोटीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया होणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग देखील झाला आहे. काही टप्पे राहिले आहेत. या दोन्ही महामर्गांना शक्य तिथे जोडून ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ तयार करण्यात येणार आहे. हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यास पर्यटनाला मोठी संधी आहे. महामार्गाच्या पुढची ही पायरी आहे. या एक्स्प्रेस वे मध्ये एकदा त्या मार्गावर वाहन गेल्यास लवकरच दुसरीकडे जाण्याचा फाटा मिळत नाही. ठराविकच फाटे असणार आहे. त्यात वाहनांचा वेग 120 किमी ठेवावा लागतो. ग्रीन फिल्ड म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हरित पट्टे असणार आहे. अतिशय आकर्षक आणि पर्यटन वाढीला मदत करणारा हा प्रकल्प आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.