सागरी महामार्गावरील काळबादेवी-आरेवारे सागरी महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

एमएसआरडीसी; पाच किलोमिटरच्या रस्त्याचे अंदाजत्रक नव्याने

रत्नागिरी:- सागरी महामार्गावरील काळबादेवी ते आरे-वारे या पाच किलोमिटरच्या टप्प्यातील समुद्र किनाऱ्यावरील सर्व्हेक्षण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजूरीसाठी शासनाला सादर केले जाणार आहे.

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम वेगाने सुरू असून काळबादेवी येथील खाडीवरील पूल बांधण्यात येणार आहे. त्याचा ठेकेदारही निश्चित
झालेला आहे. पुढील रस्त्याबाबात एमएसआरडीसीतर्फे स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली होती. काळबादेवी गावातून रस्त्यासाठी दोन पर्याय ठेवलेले होते. त्यामध्ये शेतजमिन आणि काही लोकांची घरे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यावेळी ग्रामस्थांनी काळबादेवी किनाऱ्यावरून आरे-वारेपर्यंत मार्ग न्या अशी सुचना केली होती. ग्रामस्थांनी सुचवलेला पर्याय निश्चित करून एमएसआरडीसीतर्फे पंधरा दिवसांपुर्वी सर्व्हेक्षण सुरू केले. एमएसआरडीसीचे अधिकारी अजय झा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. हा मार्ग काळबादेवी किनाऱ्यावरील दर्ग्यापासून धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या बाजूने आरे-पुलापासून तिनशे मिटर आधी बाहेर पडणार आहे. सुमार पाच किलोमिटर लांबीचा हा रस्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा मार्ग सीआरझेड १ ए या झोनमधून आणि वन विभागाच्या जागेतून जातो. त्यामुळे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील परवानगीसाठी पावले उचलली जाणार आहेत.