बिगर यांत्रिकी स्पर्धा ; भाटये, कर्ल्यातील मच्छीमार विजयी, पोलिस दलाचे आयोजन
रत्नागिरी:- मिशन सागरअंतर्गत रत्नसागरचा राजा, बिगर यांत्रिकी (पगार) स्पर्धेत सागराचा राजा मच्छीमारांचा थरार पाहावयास मिळाला. अटीतटीच्या या स्पर्धेत विजयासाठी मच्छीमारांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यामुळे कर्ला येथील समुद्रात स्पर्धेत सहभागासाठी आणि स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून आणि रत्नागिरी पोलिस दलाने ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये ४० स्पर्धकांनी भाग घेतला. कर्ला जेट्टीच्या सागरी किनाऱ्यावर ही स्पर्धा झाली. सागरामध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या मच्छीमार, बोट चालवणारे, कोळीबांधव यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणे, सागरी सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून या स्पर्धेचे पोलिसदलाने आयोजन केले होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, सचिन बारी, शशिकिरण काशिद, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, अविनाश केदारी, मनोज भोसले कर्ला ग्रामपंचायत सरपंच जबीन शिरगावकर, उपसरपंच समीर भाटकर, कर्ला मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष नदीम सोलकर व सुमारे ४०० स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
विजेत्या स्पर्धकांना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक, प्रशस्तीपत्र व चषक प्रदान करण्यात आला. यामध्ये मोजाम मोहम्मद मिरकर व सिकंदर कासम भाटकर (भाटये), अल्तमश ताजुद्दीन होडेकर व मिलाद अब्छुल्ला सोलकर (भाटये), बिलाल रशिद सोलकर व शोएब शफिक बुडये (रा. कर्ला) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. त्यांना अनुक्रमे पाच, तीन आणि दोन हजार रुपये तसेच प्रशस्तीपत्र आणि चषक देण्यात आला. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.