साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पत्कीवाडी येथील विजय दिगंबर शिंदे उर्फ भाव्या शिंदे (वय- ४२) यांचा मंगळवारी रात्री कोल्हापूर-पन्हाळा येथील पैजारवाडी येथे अपघाती मृत्यू झाला आहे. विजय उर्फ भाव्या शिंदे यांच्या अपघाती मृत्यूने साखरपा परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिंदे हे काल रात्री आपल्या ताब्यातील लाकूड भरलेला सहाचाकी ट्रक (एमएच १७ / बी. वाय १८८७) घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथे ट्रकचा अपघात होऊन ट्रक पलटी झाला. या अपघातात विजय शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. विजय शिंदे यांच्या मृत्यूची बातमी समजताच साखरपा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.









