दापोली:- माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी आणखी एक गुन्हा दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे, तर मागील दोन महिन्याची हा चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकार्यांतर्फे समुद्राचा जागेवर अनधिकृतरित्या भरणी करून, साई रिसॉर्टचे स्वागत कक्ष बांधणे, सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यासाठी तसेच अन्य कारणांवरुन अनिल परब आणि सदानंद कदम यांचा विरोधात दापोली पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालिन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोरोनाकाळात दापोली येथे समुद्रकिनारी अनाधिकृत साई रिसॉर्टचे बांधकाम केले आहे. कोरोनाचे निर्बंध असताना आणि कोरोनाचे नियमावली असताना, सर्व काही बंद असताना कोरोनाकाळात अनिल परब यांनी येथे कसे काय साई रिसॉर्टचे बांधकाम केले? असा सवाल भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच येथे आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रीगचा पैसा वापरण्यात आला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली, त्यानंतर अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची काही महिन्यांपूर्वी ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली.
दरम्यान, दापोलीतील साई रिसॉर्टचे बांधकाम पूर्णपणे अनाधिकृत असून यावर हातोडा पाडावा अशी मागणी राज्य सरकारकडे किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर अनिल परब यांच्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागला असून, आता या प्रकरणी चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.