सांडपाण्यात ताडगोळे धुणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

खेड:- खेड शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला हातगाडीवर ताडगोळे विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अलाउद्दीन कुदृस शेख (वय ६४, रा. बालूग्राम पश्चिमी, झारखंड) हा त्याच्या हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुवत असताना आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता पोलीस शिपाई तुषार रमेश डोंड हे खेड बस स्टँड ते तीनबत्ती नाक्याकडे जात असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. शेख हा रस्त्यालगत असलेल्या गटारातील सांडपाण्यात ताडगोळे धुवून मानवी आरोग्यास धोका निर्माण करत होता, तसेच रोगाचा संसर्ग पसरवण्याची शक्यता होती.

या निष्काळजी कृत्याबद्दल पोलीस शिपाई तुषार डोंड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी अलाउद्दीन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून, अन्नपदार्थांची विक्री करताना स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.