रत्नागिरी:- जिल्ह्यात चार पट्टेरी वाघांचा संचार आहे. त्यातील तीन पट्टेरी वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील आहेत तर एक वाघ रत्नागिरी जिल्ह्यातच वास्तव्यास आहे, अशी माहिती विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली.
गेले अनेक दिवस पट्टेरी वाघाचे दर्शन झाले म्हणून गावखेड्यामध्ये सांगितले जात होते. ठिकठिकाणी त्याच्या चर्चा सुरू होत्या तर काहींनी पट्टेरी वाघ पाहिला देखील होता. मात्र, वन विभागाकडून त्या बाबत स्पष्टीकरण येत नव्हते. परंतु पालकमंत्र्यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वन वणवा मुक्त’ अभियान अंतर्गत चर्चासत्रात बोलताना गिरीजा देसाई यांनी जिल्ह्यामध्ये चार पट्टेरी वाघांचा संचार सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे आता जिल्ह्यात पट्टेरी वाघाच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत आहे. हे बिबटे मानवी वस्तीत शिरकाव करीत असून अनेकवेळा भटकी कुत्री हे त्यांचे खाद्य झाले आहे. मात्र, त्या अनुषंगानेच जिल्ह्यात आता पट्टेरी वाघांचा देखील संचार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात माहिती देताना विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्या, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तीन पट्टेरी वाघ कोयना अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व जिल्ह्यात देखील संचार करीत आहेत. या शिवाय एका पट्टेरी वाघाचा केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच मुक्त संचार सुरू आहे. ज्या भागात पट्टेरी वाघांचा संचार असतो ते जंगल समृद्ध असते असे मानले जाते. यामुळे वाघांच्या संचाराने जिल्ह्यात वृक्षसंपदा व जंगल समृद्ध असल्याचेच पुढे येत आहे. या शिवाय जिल्ह्यात सहा ब्लॅक पॅन्थरदेखील वावरत आहेत. हे चार वाघ व ब्लॅक पॅन्थर हे सीसीटीव्ही कॅमेर्यात देखील चित्रीत झाले आहेत.