रत्नागिरी:- जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. सहाव्या टप्प्यात झालेल्या बदल्या वादात व चर्चेत आल्या आहेत. शनिवारी बदली झालेल्या 64 शिक्षकांनी जि.प. भवनात येवून गोंधळ घातला. यामुळे वातावरण तंग झालं होतं.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. तेथील सहावा टप्प्याच्या बदल्या गोंधळात सापडल्या आहेत. 169 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या शिक्षकांना अन्य तालुक्यात जावे लागले आहे. त्यातील काही शिक्षकांचं म्हणणं आहे की आमचं वय 50 पेक्षा जास्त असल्याने आहे त्याच ठिकाणी ठेवावे. येथील 44 शिक्षक न्यायालयात गेले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
असे असतानाही 64 शिक्षकांना पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार शनिवारी समुपदेशनासाठी जि.प. भवनात बोलावण्यात आले होते. दुपारी 1 वाजता बोलावण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना ताटकळत ठेवण्यात आले होते. शेवटी सायंकाळी 6 वाजता तुम्हाला कामगिरीवर शाळा देण्यात येईल. मात्र हे या शिक्षकांना मान्य नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला कायमस्वरुपी शाळा देण्यात यावी. यामुळे प्रशासन आणि शिक्षक यांच्यामध्ये तु..तु..मै..मै.. झाले. सायंळी 7 वाजेपर्यंत हे शिक्षक जि.प. भवनात ठाण मांडून बसले होते.
पालकमंत्र्यांनी सूचना देवूनसुद्धा या शिक्षकांचे समुपदेशन घेतले नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. मूळात या शिक्षकांना कामगिरीवर शाळा देण्याचे प्रशासनाने मान्य केले असतानाही या शिक्षकांचा एवढा अट्टाहास का? याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रशासनाने सुट्टी असतानाही या शिक्षकांना बोलावले ही बाबसुद्धा चर्चेची झाली आहे.