रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महिला राखीव मतदारसंघातून सौ.नेहा रवींद्र माने, सौ.दिशा दशरथ दाभोळकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. सहकार पॅनेलचे 21 पैकी 11 उमेदवार अद्यापपर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत.
महिला राखीव मतदारसंघातून संचालकांच्या दोन जागा निवडून द्यावयाच्या आहेत. नेहाली लिलाधर नागवेकर यांचा अर्ज छाननी बाद झाल्याने दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सौ.स्नेहल सचिन बाईत, आश्विनी जालिंदर महाडिक यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सौ.नेहा माने, सौ.दिशा दाभोळकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सोपान शिंदे यांनी छाननीत अर्ज बाद केलेल्या चौघांनी नवी मुंबईतील सहकारच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयात अपिल दाखल केले होते. इतर मागास प्रवर्ग, राजापूर तालुका मतदारसंघातील रविकांत केशव रूमडे, नागरी पतसंस्था मतदारसंघातील नित्यानंद भार्गव दळवी, लांजा तालुका मतदारसंघातून सुरेश विष्णू साळुंखे, मंडणगड तालुका मतदारसंघातून रघुनाथ पांडुरंग पोटसुरे यांनी दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी पूर्ण झाली असून येत्या दोन दिवसात निकाल अपेक्षित आहे.
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि.10 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. आजपासून सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया बंद राहील. दि.8 नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असून त्यानंतर सहकार पॅनेलचे आणखी काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघात निवडणूक अटळ आहे.