रत्नागिरी:- चिपीच्या विमानतळाप्रमाणेच रत्नागिरीच्या विमानतळावर देखील 72 सिटरचे विमान सुरक्षितरित्या उतरु शकते. सद्या हे विमानतळ कोस्टगार्डच्या ताब्यात असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. नाईट लँडीगची सुविधा याठिकाणी महिनाभरात कार्यन्वित होणार असली तरी सुरक्षा व अन्य गोष्टींची पूर्तता होऊन देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यास आणखी सव्वा वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
रविवारी ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली. यावेळी कोस्टगार्डचे कमांडर निरज सिंग उपस्थित होते. विमानतळ व परिसरात सुरु असणार्या कामाची व उपक्रमाची त्यांच्याकडून ना. सामंत यांनी माहिती घेतली.
चिपी विमानतळाऐवढीच येथील धावपट्टी आहे. त्याचप्रमाणे धावपट्टीला सुरक्षा म्हणून आता चिरेबंदी संरक्षक भिंत घालण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोल्ह्यांसारखे जंगली प्राणी धावपट्टीवर येण्यास प्रतिबंध होणार आहे. देशांतर्गत सेवा सुरु करण्यासाठी अद्याप काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. विमानपार्कींग व अन्य उपाययोजनांसाठी साडेसतरा एकर जागेची आवश्यकता असून, ती जागा घेण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तात्पूरत्या स्वरुपात खासगी जागा ताब्यात घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कोस्टगार्डचे उपक्रम याठिकाणी सुरु असतात, त्या कालवधित विमानांची ये-जा सुरु असते. रात्रीही विमाने उतरावीत यासाठी नाईट लॅण्डींगची सुविधा महिनाभरात सुरु होणार आहे. त्याचाही फायदा डोमेस्टीक विमानांसाठी होऊ शकतो. कोस्टगार्डप्रमाणेच खासगी विमानांना उतरण्यास याठिकाणी परवानगी दिली जाते. परंतु डोमेस्टीक विमानतळ कधी व कसे सुरु करायचे याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तांत्रिक बाबी पूर्ण होण्यास आणखी वर्ष-सव्वावर्षाचा कालावधी लागणार असून लवकरच रत्नागिरीकरांचे विमानामध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासाबत उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी माजी नगरसेवक निमेश नायर आदी उपस्थित होते.