सव्वा महिन्यात अवघ्या एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी:- एक हजार मिलीमीटरची सरासरी पार करण्यासाठी यावर्षी पावसाने सव्वा महिन्याचा कालावधी घेतला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चारशे मिलिमीटर सरासरी कमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या सरींचा पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीसाठीची कामे बळीराजा करत आहे. जुन महिन्यात मॉन्सून उशिरा दाखल झाल्यामुळे पेरण्या लांबल्या आणि शेतीचे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस अनियमित राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणारे मॉन्सूनचे आगमन शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबले. त्यामुळे भात पेरण्याही उशिराने सुरु करण्यात आल्या होत्या. धुळवाफ पेरण्या केलेल्या शेतकर्‍यांनी रोपं रुजून यावीत यासाठी पंपाने पाणी दिले होते. 22 जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. जुन महिन्यात सरासरी 820 मिलीमीटर पाऊस पडतो; मात्र यंदा अखेरपर्यंत 200 मिमी कमी नोंद झाली. त्यानंतरही पावसाची अनियमितता सुरुच आहे. अजुनपर्यंत 20 टक्केच लावण्या झाल्या आहेत. आषाढ संपून श्रावण महिना सुरु झाला तरीही कोकणाची ओळख असलेल्या मुसळधार पावसाची प्रतिक्षाच आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजार मिलमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. ही आकडेवारी पार करण्यासाठी यावर्षी एक महिना तेरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला. जुलै महिन्यातही पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे या महिन्याची 1200 मिमीची सरासरी पार करणेही शक्य नसल्याचेच दिसते. जिल्ह्यात एकुण सरासरी पाऊस 3300 मिमी पडतो. दिड महिन्यात 35 टक्के पावसाची नोंद झाली आहे. अजुनही जिल्ह्यातील काही धरणे पूर्णतः भरलेली नाही. जुलैच्या अखेरपर्यंत धरणे भरुन वाहू लागतील असा अंदाज आहे. गतवर्षी याच कालावधीत दीड हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तुलनेत चारशे मिमी कमी पाऊस झाला आहे. ही सरासरी पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संगमेश्‍वर आणि रत्नागिरी या दोनच तालुक्यात हजार मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात गतवर्षी अनुक्रमे 1509 आणि 1435 मिमी नोंद होती. सर्वाधिक पाऊस पडणार्‍या संगमेश्‍वर तालुक्यात यंदा सर्वात कमी पाऊस नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक पाऊस दापोलीत पडला आहे.