गणेशोत्सव ; ३ कोटी ५१ लाख ३६ हजार उत्पन्न, गतवर्षी पावणेपाच कोटी उत्पन्न
रत्नागिरी:- यंदाचा गणेशोत्सव एसटीला चांगलाच पावला. गतवर्षाच्या तुलनेत जादा गाड्या आणि जादा प्रवासी वाहतूक एसटीने केली; पण गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न कमी मिळाले. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत प्रवाशांना तिकिटात दिलेल्या सवलतीचा हा परिणाम आहे. एसटीने यंदाच्या गणेशोत्सवात १० लाख ६६२ प्रवाशांची वाहतूक करून ३ कोटी ५१ लाख ३६ हजार ५९१ एवढे उत्पन्न मिळवले. गतवर्षी हेच उत्पन्न पावणेपाच कोटी होते.
जिल्ह्यात यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. २ हजार ४२८ जादा गाड्यांमधून मुंबईकर कोकणात आले होते. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी मुंबईकरांना २ हजार ७५३ जादा गाड्या रत्नागिरी एसटी विभागातून सोडण्यात आल्या. यातून १० लाख ६६२ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. एसटीला या वाहतुकीतून ३ कोटी ५१ लाख ३६ हजार एवढे उत्पन्न मिळाले; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नामध्ये मोठी घट आहे.
रत्नागिरी विभागातून दैनंदिन १०० गाड्या मुंबई मार्गावर धावतात. यावर्षी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले होते. त्यामुळे आलेल्या गाड्यांसह परतीसाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांच्या संख्येतही वाढ झाली होती. गतवर्षी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात १ हजार ८२५ जादा गाड्या आल्या होत्या. परतीसाठी १ हजार ४०० गाड्या सोडण्यात होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला ४ कोटी ८३ लाख ४४ हजार उत्पन्न मिळाले होते; परंतु महिला सन्मान योजनेसह ज्येष्ठ नागरिक सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत देण्यात आली. त्यामुळे जादा प्रवासी वाहतूक करूनही रत्नागिरी एसटी विभागाला यंदा ३ कोटी ५१ लाख ३६ हजार ५९१ रुपये उत्पन्न मिळाले. सुमारे सव्वाकोटीच्यावर उत्पन्न घटले आहे.