रत्नागिरी:- जागा-जमिनीवरुन भाऊबंदकीत होणारे वाद टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुनही प्रयत्न सुरु असतात. शेतजमिनींचा ताबा अदलाबदली करता यावा यासाठी दस्तांमध्ये सवलत देण्यात आली असून, शासनाकडून सलोखा योजना राबवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्यासाठी तहसील पातळीवर प्रयत्न सुरु झाले असून गावागावात जनजागृतीसाठी बैठका होत आहेत.
सध्या जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाचा सण मोठ्याप्रमाणात साजरा होऊ लागला आहे. या कालावधीत चाकरमानी मोठ्यासंख्येने ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. सणउत्सवादरम्यान अनेकदा शेतजमिनींवरुन भाऊबंदकीचे वाद होत असतात. त्यामुळे शेतजमिनीच्या एका तुकड्याऐवजी दुसर्या तुकड्यांवर हक्क सांगितले जातात. यातून शेतजमिनीचा विकासही होत नाही. शेतकर्यांनी संमंतीने जमिनीच्या अदलाबदल केल्यास शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे अल्प दरात दस्तांसाठी सवलतही देण्यात आली आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क एक हजार रुपये तर नोंदणी फी शंभर रुपये आकारण्यात येणार आहे.
शेतजमिनीच्या अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याच्यात्याच्या नावे होणार आहे. शेतजमिनींचा कागदोपत्री ताबा मिळाल्यास शेतकर्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीच्या विविध योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. शेतकर्यांच्या किंवा भाऊबंदकीतून आपापसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडिक राहतात, वाद मिटल्यास हे क्षेत्र शेतखाली येऊ शकते. सलोखा योजना राबविल्याने परस्परविरोधी ताब्यात असणारी विविध न्यायालयीन प्रकरणेही निकाली निघण्यास मदत होणार आहे.