Saturday, October 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी सलग सुट्ट्यांमुळे रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी

सलग सुट्ट्यांमुळे रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी

रत्नागिरी:- शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी गर्दी केली आहे. त्यात गणपतीपुळे, आरे-वारे किनारी पर्यटकांचा राबता वाढलेला होता. गणपतीपुळे मंदिरात शुक्रवारी (ता. २) दिवसभरात २५ हजार भक्तांनी दर्शन घेतले. दुपारपासून किनारी भागात हलका वारा वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यातही काही पर्यटक धोका पत्करून समुद्रात उतरत असल्यामुळे किनाऱ्यावरील सुरक्षारक्षकांसह ग्रामस्थांची अडचण होत आहे.

शाळा व महाविद्यालये सुरू असली, तरी विकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ कायम आहे. पावसाची उघडीप आणि निसर्गरम्य वातावरणामुळे शुक्रवारी सकाळपासूनच गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, गुहागर आणि दापोलीच्या किनाऱ्यांवर पर्यटक दाखल झाले होते. सायंकाळी आरे-वारे किनाऱ्यावर मावळता सूर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये नवविवाहित दांपत्ये आणि तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या उंचावलेल्या लाटांचा आनंद घेण्यासाठी अनेक तरुण-तरुणी थेट पाण्यात उतरत आहेत. मात्र, भरतीच्या वेळी समुद्रात अचानक भोवरे तयार होत असल्याने हा बिनधास्तपणा जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक व्यावसायिक आणि जीवरक्षक पर्यटकांना या धोक्याची पूर्वकल्पना देऊन सतर्क करत आहेत; मात्र अनेक पर्यटक या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.


आरे-वारेत दोघांना वाचवले

शुक्रवारी किनाऱ्यावरील पाण्यात उतरलेले रत्नागिरीतील दोन पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक बुडू लागले. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या झिपलाईन चालवणाऱ्या स्थानिक तरुणांनी तात्काळ पाण्यात उड्या मारून तत्परतेने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या देवदूतांसारख्या धावून आलेल्या तरुणांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. ते दोघेही रत्नागिरीतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ही माहिती मिळाल्यानंतर आरे पोलीस पाटील आदेश कदम यांना त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सहकार्य केले. पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते प्रवाहासोबत वाहून जात होते. काल दिवेआगार (ता. रायगड) येथे समुद्रात सहलीसाठी आलेले विद्यार्थी बुडाल्यामुळे कोकण किनारपट्टीवरील सर्वच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.


आरे-वारेत होमगार्ड नियुक्त करा

जुलै महिन्यात गणपतीपुळे किनारी पर्यटक बुडाल्याच्या प्रकारानंतर पोलिस प्रशासनाकडून आरे-वारे किनारी सुरक्षेसाठी होमगार्डची नियुक्ती केली होती. परंतु काही दिवसांपुर्वी त्यांची किनाऱ्यावरील ड्युटी थांबवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पर्यटकांचा राबता वाढत राहणार आहे. त्यामुळे होमगार्डस् ची नेमणूक कायम ठेवावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


आरे-वारे किनारी समुद्र आणि खाडी एकत्र येण्याच्या ठिकाणी पर्यटक पोहायला गेले तर दुर्घटना घडण्याची भिती असते. सध्या समुद्राच्या पाण्याला करंट असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यासाठी पर्यटकांनी खोल पाण्यात उतरू नये.

  • –आदेश कदम, पोलिस पाटील,