रत्नागिरी:- नोरु चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे कोकण किनारपट्टीला सलग तिसर्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील हळवी भाताची लागवड धोक्यात आली आहे. ठिकठिकाणची उभी भातं आडवी पडली असून लोंब्यांना मोड येण्याची भिती आहे. शनिवारी हीच परिस्थिती राहीली तर सुमारे 25 हजार हेक्टरवरील हळवी भातांना पावसाचा तडाखा बसू शकतो. पावसाचा जोर 10 ऑक्टोबरपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 7) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 31 मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड 10, दापोली 21, खेड 13, गुहागर 10, चिपळूण 58, संगमेश्वर 27, रत्नागिरी 82, लांजा 36, राजापूर 22 मिमी पाऊस झाला. सलग तिसर्या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढत गेला. पहाटेच्या सुमारास पावसाने विश्रांत घेतली; मात्र शुक्रवारी सकाळपासून संततधार सुरुच आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पाणी भरले असून काँग्रेस भवन परिसरातील खड्डे पाण्याने भरुन गेले होते. त्यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत सुरु होती. ऐन ऑक्टोबर महिन्यात कडकडीत उन्हाळ्याऐवजी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा तडाखा भातशेतीला बसला आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातील पावस, गोळप, काळबादेवी, कासारवेली, हातखंबा, करबुडे, निवळी, संगमेश्वर, चिपळूणसह अन्य तालुक्यातही पावसाने उभी भातं आडवी पडली आहेत. 110 दिवसांनी होणारी हळवी भात बियाणे कापणीसाठी तयार झाली आहेत. जिल्ह्यात 68 हजार हेक्टरवर भात लागवड झाली असून सुमारे 25 हेक्टरवर हळवी बियाणे आहेत. सलग तिन दिवस तयार झालेली भातं पाण्यात पडून आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यात भातांची रोपं आडवी पडून राहिल्याने ती पुन्हा रुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसात भिजलेले भात कापून झोडले तर तांदुळ काळा पडतो आणि तो खाण्या योग्य राहत नाही. शनिवारी पाऊस सुरुच राहिला तर हळव्या भातांचे मोठे नुकसान होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. हवामान विभागाने 10 ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात काही ठिकाणी 30-40 प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांपैकी विमा काढलेल्यांनी तात्काळ संबंधित कंपनीकडून पंचनामे करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पाऊस सुरुच राहीला तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.









