फेरीवाल्यांना मिळणार विक्री प्रमाणपत्र, ओळखपत्र
रत्नागिरी:- शहरात पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये ७१४ फेरीवाले असल्याची नोंद झाली आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेंतर्गत हा सर्व्हे झाला. यातून ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, त्यांना १० हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. शहरात असे ३०२ हातगाडीधारक आहेत. त्यांना शासनाकडून १५०० रुपये मदत मिळणार आहे; मात्र ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे वेगळेच वातापरण निर्माण झाले आहे. या सर्व्हेमध्ये १५ टक्के परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाल्याने स्थानिकांमध्ये वेगळी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
रत्नागिरी पालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत हा १५ एप्रिलपासून हा सर्व्हे झाला. यामध्ये वडापाव, भाजीविक्रेते, हातगाडीवाले, मच्छीविक्रेत्यांचाही समावेश आहे. पालिकेच्या सर्व्हेमध्ये ७१४ जणांची नोंद झाली आहे. मोबाईल अॅपवर हा सर्व्हे झाला आहे. त्यांचे आधार कार्ड, मोबाईल नंबर व इतर कागदपत्रे घेण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत ज्या फेरीवाल्यांनी १० हजाराचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केले होते, त्यांना या लॉकडाउनमध्ये शासनाकडून १५०० रुपये दिले जाणार आहेत.
लॉकडाउनमध्ये थांबलेले सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरू होऊन आता सभागृहाची मान्यता देऊन या फेरीवाल्यांना विक्री प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्याने हल्ला करून बोटे तोडली. संपूर्ण महराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. महापालिका, नगरपालिका प्रशासनात काम करणारे सर्वच कर्मचारी या घटनेने संतापले असून त्यांनी कामबंद आंदोलन केले. यावरून रत्नागिरीतदेखील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतूककोंडी होऊन स्थानिकांवर कारवाई होते. त्यामुळे रत्नागिरीतही परप्रांतीयांबाबत काहीसे वातावरण गढूळ झाले आहे. सर्व्हेमध्ये १५ टक्के परप्रांतीय असल्याची नोंद आहे.