शेकडो नागरिकांची गर्दी; दाखल वितरण रखडले
रत्नागिरी:- शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व नागरिकांना व्यक्तिगत कामासाठी लागणारे दाखले, कागदपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू, महाईसेवा व नागरी सुविधा केंद्रे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सोमवारी ठप्प झाली. त्याचा परिणाम ऑनलाईन सेवांवर झाला असून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये शेकडो नागरिक दिवसभर ताटकळत राहिले होते. सायंकाळी उशिरापर्यंत सर्व्हरच्या तांत्रिक दोष कायम राहिल्याने नागरिकांना दाखल न घेताच घरी परत जावे लागले.
राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत सेतू, महा‚ई‚सेवा केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. सोमवारी सकाळपासूनच महा ऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रावरील कामकाज तांत्रिक कारणास्तव ठप्प झाले. त्यामुळे इतर कामकाजासाठी देखील या केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून येत असून अनेक केंद्र बिघाड असल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत.ज्यांनी अगोदरच दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे ते दाखलेही स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत. सर्व्हर डाउन असल्यामुळे अधिकार्यांना लॉग इन करता येत नाही त्यामुळे दाखलाच ओपन होत नसल्याने थम्ब देणार तरी कसा असा सवाल अधिकार्यांनी उपस्थित केला आहे.
सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने दाखल्यांसाठी मोठया प्रमाणावर अर्ज येत आहेत. तसेच शासनाच्या विविध भरती प्रक्रियांच्या शक्यतेमुळे पुर्वतयारी म्हणून दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करत असल्याने अर्जांची संख्या वाढली आहे. अशातच राज्य शासनाच्या नव्या योजनांसाठी आवश्य दाखल्यांसाठी नागिरक गर्दी करत आहेत. त्यातच संपूर्ण राज्यासाठी एकच क्लाऊड सर्व्हर आहे. संपूर्ण राज्याचे दाखल्यांचे वितरण प्रक्रिया या एकाच सर्व्हरवरून केली जात असल्याने क्लाऊडमध्ये जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे नवीन अर्ज स्विकारण्यात अडचणी येत आहेत. याकरीता प्रत्येक जिल्हयासाठी स्वतंत्र क्लाऊड सर्व्हर देण्याची मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये सोमवारी प्रचंड गर्दी पहायला मिळाली. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दाखल अपलोड होण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे सेतूला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.









