सरल पोर्टलमधून नियुक्ती स्थानिक शिक्षकांसाठी अडचणीची 

शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण; अनेक शिक्षकांना फटका 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया गेले दोन महिने रखडली आहे. त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातून अन्य तालुक्यात गेलेल्यांना बसणार आहे. विनंती बदल्यांमुळे मागील वर्षी अन्य तालुक्यात गेलेल्या या शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला होता; परंतु प्रक्रिया रखडल्याने त्यांच्या इच्छांवर पाणी फेरले गेले. जिल्ह्यातील रिक्त पदांवर सरल पोर्टलमधून शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार असल्याने स्थानिक शिक्षकांची अडचण होणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

कोरोनातील परिस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत होती. शिक्षकांच्या बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रिया घेतली तर गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही प्रक्रिया घेऊ नये अशीच मागणी सुरु होती. शासनाने परिपत्रक काढत प्रशासकीय बदल्या रद्द केल्या, मात्र विनंती बदल्या करा अशा सुचना दिल्या होत्या. ती प्रक्रिया 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही होते. प्राथमिक शिक्षण विभागातून इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले. सुमारे चारशेहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. मागील वर्षी ऑनलाईन प्रक्रिया राबविल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या काही शिक्षकांची नियुक्ती अन्य तालुक्यांमध्ये करण्यात आली. त्यात चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक शिक्षकांचा समावेश होता. रत्नागिरी तालुक्यातील सुमारे 65 शिक्षक गुहागर, राजापूर, लांजा तालुक्यात गेले. राजापूर, खेड तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे अधिक होती. त्यामुळे या तालुक्यांना प्राधान्य दिले गेले. यंदाच्या विनंती बदलीमध्ये तरी स्वतःच्या तालुक्यात येण्याची संधी मिळेल या आशेने शिक्षकांच्या जिल्हा परिषदेतील फेर्‍या वाढल्या. ही प्रक्रिया पार पाडावी यासाठी शिक्षण सभापतींसह जिल्हा परिषद अध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनाही साकडे घालण्यात आले होते. प्रक्रिया राबविण्याची मुदत टळून गेल्याने विनंती बदल्या रखडल्या. शिक्षकांकडून होत असलेल्या मागणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी शिक्षणमंत्र्यांना भेटून चर्चाही केली होती. अजुनही यासंदर्भात वरीष्ठस्तरावरुन आदेश प्राप्त झालेले नाहीत.

पुढील वर्षात जनगणना होणार असल्यामुळे शासनाच्या निकषानुसार बदल्यांची प्रक्रिया होत नाही. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्याही अधिक असल्याने पदभरतीची मागणीही केलेली होती. त्याला अनुसरुन सरल पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे. मुंबईसह परजिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना रत्नागिरीत नियुक्ती दिली जाईल. तसे झाले तर रत्नागिरी तालुक्यातून अन्य तालुक्यात गेलेल्या शिक्षकांच्या परतीचा मार्ग बंद होणार आहे. रत्नागिरीत सध्या 40 पदे रिक्त आहेत. विनंती बदल्यांची प्रक्रिया लवकर झाली तरच अन्य तालुक्यातील शिक्षक गावाकडे परतू शकतील. अन्यथा पुढील दोन वर्षे त्यांना त्याच तालुक्यात काम करावे लागणार आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.