रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाचे ४०६ उमेदवार तर सदस्यपदाच्या १२०६ उमेदवारांचे भवितव्य रविवारी (ता. १८) मतपेटीत बंद झाले. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ४४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५७.३१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत ६६ टक्केपर्यंत मतदान झाले असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे १५५ सरपंच आणि ६६६ सदस्यांच्या जागांसाठी आज ५०७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सरपंचपदासाठी ४०६ उमेदवार तर सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया झाली. रत्नागिरी तालुक्यात एका ठिकाणी यंत्र बंद पडल्याची नोंद झाली होती. ते तात्काळ बदलण्यात आले. रविवारी शासकीय सुट्टी असली तरीही सकाळच्या सत्रात बहुसंख्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.३१ टक्के मतदान झाले होते. २ लाख १५ हजार ३९९ मतदारांपैकी १ लाख २३ हजार ४४० मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. त्यात ६३ हजार ३२७ महिला तर ६० हजार ११३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. सायंकाळच्या सत्रात आठ ते दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ६६ ते ६७ टक्केपर्यंत मतदान झाले असावे. सर्वाधिक मतदान मंडणगड तालुक्यात ६३ टक्केपर्यंत तर सर्वात कमी संगमेश्वर तालुक्यात ५१.६८ टक्के नोंद झाली. जिल्ह्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरुध्द बाळासाहेबांची शिवसेना अशी चुरस निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि दापोली-खेड विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही ठिकाणी भाजपकडूनही निवडणुक लढविण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मतपेट्या तालुक्याच्या ठिकाणी आणण्याचे काम सुरु आहे. दिवसभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी २० डिसेंबरला तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.