देवदीपावलीच्या पार्श्वभूमीवर बविआची मागणी
रत्नागिरी:- आगामी ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर येत्या 15 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याच दिवशी कोकणात ‘देवदीपावली’ सण साजरा होतो. याचदिवशी मोठ्या प्रमाणात घरोघरी विडे भरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून या उत्सव दिवसाचा विचार करुन सरपंच आरक्षण कार्यक्रम पुढे घेण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे बविआतर्फे करण्यात आली आहे.
प्रशासनाने जिह्यातील सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती या ग्रामीण भागाशी निगडीत आहेत. 15 डिसेंबर या दिवशी सकाळी 11.00 वा जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत ठेवली आहे. परंतु याच दिवशी प्रामुख्याने कोकणातील प्रत्येकाच्या घरोघरी विडे भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला देवदिपावली असे म्हटले जाते. हा दिवस कोकणात शेतकरी वर्ग घरोघरी उत्सव म्हणून साजरा करतो. त्यामुळे या दिवसाला ग्रामीण भागात फार महत्त्व आहे. या दिवशी मुंबईतील ग्रामस्थ (चाकरमणी) विडे भरण्यासाठी गावी येत असतात. आपण जिल्ह्याचे प्रशासकिय अधिकारी आहात. आपणाला या दिवसाचे महत्त्व माहीत असून सुध्दा जाणिवपूर्वक हिच तारीख अधोरेखित केली असल्याचा आक्षेप बविआतर्फे नोंदवण्यात आला आहे.
यादिवशी जेणेकरुन आपण सुचविलेले प्रतिनिधी येणार नाहीत व आपल्या सुचना आक्षेप घेणार नाहीत याची योग्य खबरदारी घेतली आहे. हा फक्त प्रशासकिय कार्यक्रम घेवून कार्य उरकून घेण्याचा प्रकार असल्याचे बविआचे जिल्हाप्रमुख तानाजी कुळये यांनी म्हटले आहे. खरं तर हा लोकाभिमुक कार्यक्रम असला पाहिजे. परंतु आपल्याकडुन तो होताना दिसत नाही. आपल्या पत्रामध्ये सरपंच, प्रशासक व 3 प्रतिनिधी उपस्थित रहाण्याचे सुचविले आहे. परंतु बहुतांशी कुटुंबामध्ये देवदिपावलीचा सण सकाळपासून सायंकाळपर्यंत असल्याने ते प्रतिनिधी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे कुणाला आक्षेप, सुचना मांडला येणार नाहीत. यास्तव त्याच्या संविधानिक अधिकारावर गदा येणार आहे. देवदिपावली हा सण ग्रामीण भागात प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणात घरोघरी उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकाकडे आनंदाचे वातावरण असते. समस्त शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाचे आराध्य दैवत युगपुरुष सम्राट बळीराजा यांचे याच दिवशी पुजन केले जाते. या दिवशी सर्व स्त्री-पुरुष लहान मुले दिवसभर आनंदी वातावरणात असतात कारण त्यांचा खरा भाग्यविधाता परोपकारी राजा सम्राट बळीराजा याच स्तवन केले जाते. आरती केल्या जातात, विडे भरून एकमेकाना अलिंगन दिले जाते. अशा या दिवशी महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकणातीत समस्त शेतकरी- शुभगिनी सम्राट बळीराजाने घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे त्याचे प्रतिक म्हणून पानाचे विडे मांडून त्याचे समप्रमाणात वाटप केले जाते. याच दिवशी शेतक-यांचा खरा मित्र ज्याच्यावर आयुष्यभर शरीराची भूक भागविली जाते. ती शेती बैलांच्या ( गुरांच्या मदतीने केली जाते) या बैलांचे पोळ्या खाऊ घालून पुजन केले जाते. असा आनंदाचा दिवसभर कार्यक्रम असतो. अशा दिवशी आपण आपल्या अधिकारात सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी देवदिपवाली या उत्सव दिवसाचा विचार करुन सरपंच आरक्षण कार्यक्रम पुढे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे येथील महसूल शाखा निवासी तहसिलदार एस.के.खेडसकर यांना बविआचे जिल्हापमुख तानाजी कुळये, अजय विर, शैलेश खर्डे यांनी दिले आहे.