रत्नागिरी:- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात जिल्हा प्रशासनाकडून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही काम करण्यात येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विविध कामांना आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. तसेच विविध कार्यालयात होण्यासारख्या कामांनाही आचारसंहितेचे कारण सांगून नागरिकांची अडवणूक केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सहकार विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, यासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयात जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून कामानिमित्त नागरिक येत असतात. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आलेल्या नागरिकांच्या कामांची विचारपूस न करता त्याला आचारसंहितेचे कारण सांगून परत पाठवले जात आहे. त्यामुळे शासकीय निमशासकीय कार्यालयात येणार्या सर्वसामान्य नागरिकांची कामे होईनाशी झाली आहेत. त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
निवडणूक आचारसंहितेचा व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीचा काय संबंध? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या व अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीची कामे करताना दिसत आहेत. परिणामी कर्मचार्यांची संख्या कमी दिसत आहे. उरलेल्या कर्मचार्यांवरच मार्च एडिंगची कामे सुरू आहेत. या कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातून विविध कामे घेऊन काही पदाधिकारी शासकीय कार्यालयात येत आहेत. मात्र, अधिकारी आचारसंहितेची अडचण पुढे करत आहेत. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या पदाधिकार्यांना काम न होताच माघारी फिरावे लागत आहे.