रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला मंगळवारपासून (ता. 28) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकूण पाच संवर्गातील पन्नास बदल्या करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया 29 पर्यंत चालणार आहे.
कोविड 19 मुळे रद्द झालेल्या प्रशासकीय बदल्या बदल्या करण्याच्या सुचना शासनाकडून आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरु केली. गेल्या काही वर्षांपासून कर्मचार्यांच्या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये अनेकवेळा राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे त्या दरवेळी वादग्रस्त ठरतात. यामधून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडतात. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत मंगळवारी समुपदेशन प्रक्रिया सुरु झाली. दिवसभरात 50 बदल्या झाल्या आहेत. येथील कै. शामराव पेजे सभागृहात ही प्रक्रिया झाली. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक, वाहनचालक, परिचर, हवालदार या संवर्गातील एकूण 50 बदल्या केल्या आहेत. यावेळी अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष महेश नाटेकर, बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते.
बुधवारी (ता. 28) ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका, कृषी विभागातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, चौकीदार तर 29 जुलै रोजी प्राथमिक शिक्षक असे समुपदेशन होणार आहे.
कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या केल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांचे सुमपदेशन प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्यच्या बदल्या होणार नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.