परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपले
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीला बसला. जिल्ह्यात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गणपतीपुळेसह सर्वच समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. यामुळे समुद्र खवळला असून धोका वाढल्याने किनाऱ्यावरील पर्याटकांना पोलिसांनी बाहेर काढले. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने देखील हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे.
वादळ होण्याच्या शक्यतेने कोकण किनारपट्टीवरील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांसह पावसाने देखील हजेरी लावली. वादळ सदृश्य परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मासेमारी नौका नांगर टाकून प्रमुख बंदरांच्या आश्रयाला उभ्या आहेत. मासेमारी ठप्प असल्याने मासळीचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे. अनेक भागात दिवाळी नंतर भातशेती कापून ठेवण्यात आली होती. मात्र याच कालावधीत परतीचा पाऊस आणि समुद्रात सुरू झालेले वादळ यामुळे कापून ठेवलेल्या भातशेतीचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.









