समुद्र खवळला; किनारपट्टी भागात उंचच उंच लाटा

रत्नागिरी:- हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात पावसासह किनारपट्टीवर वादळी वारे जोरात वाहत आहेत. याचा परिणाम मिर्‍या पंधरामाड किनार्‍यावर समुद्राच्या उंच लाटा उसळत आहेत. उधाणाच्या भरतीचा तडाखा किनारपट्टीला बसला आहे. अनेक भागात किनारपट्टीची काही प्रमाणात धूप झाली आहे.

किनारपट्टीसह सर्वत्रच मंगळवारी समुद्राला उधाण आले. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार किनारपट्टी भागात उधाणाच्या लाटांचा जोर वाढलेला होता. अजस्त्र लाटा किनारी भागात आदळत होत्या. समुद्र खवळलेला असल्यामुळे किनारी भागात उंच लाटा उसळत होत्या. तालुक्यातील काळबादेवी, गावखडी, पूर्णगड आदी भागात उधाणाचे पाणी काही प्रमाणात रहिवासी भागात शिरले होते.