समुद्र खवळला; किनारपट्टी भागात लाटांचे तांडव

रत्नागिरी:- मान्सून सक्रीय झाल्यानंतरच्या पहिल्याच अमावास्येला उधाणाच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी भागात दाणादाण उडवून दिली. पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच गुरुवारी अमवास्येच्या उधाणाचं तांडव किनारपट्टी भागात पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उधाणाचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने काही काळ घबराटीचे वातावरण होते. 

हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केलं आहे. गुरुवारी सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. एकीकडे पावसाची बरसात तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळते. गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरू आहे.  गुरुवारी अमावस्या असल्याने समुद्राला उधाण आले. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात साडेतीन ते चार मिटर उंचीच्या लाटा उसळताना पहायला मिळाल्या. पुढील दोन दिवस देेखिल अशाच पद्धतीच्या लाटांचं रौद्र रुप किनारपट्टी भागात जाणवणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.