समुद्राला उधाण; पंधरामाड- कांबळेवाडीत किनाऱ्याची मोठी धूप 

रत्नागिरी:- आठवडाभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यात पुरती दाणादाण उडवून दिली आहे. अशातच बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी समुद्र किनाऱ्याची पुरती वाताहत केली आहे. या भागातील जवळपास पंधरफुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यात देखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे. 

नुकत्याच झालेल्या अमावास्येनंतर आलेल्या उधाणाच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी भागात दाणादाण उडवून दिली. पुढील काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच बुधवारी  उधाणाचं तांडव किनारपट्टी भागात पहायला मिळाले. अनेक ठिकाणी उधाणाचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने काही काळ घबराटीचे वातावरण होते.   

या उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा मिऱ्या किनाऱ्याला बसला आहे. पंधरामाड-कांबळेवाडी येथील किनारा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत असल्याने किनाऱ्याची वाळू समुद्रात वाहून गेली आहे. किनाऱ्यावर दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तात्काळ उपाययोजना न आखल्यास मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त करण्यात आली आहे.