रत्नागिरी:- उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचा उत्तीर्णचा टक्का वाढला आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे २ हजार ४८१ विद्यार्थी उत्तीर्ण तर जिल्हा परिषद खासगी शाळांतील आठवीचे ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीचा निकाल २९ टक्के, तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २१ टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा हा दिवसेंदिवस उत्तम होत निघाला आहे. गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांची मुले अव्वल ठरत आहेत. विशेषतः शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेतील मुलांचा टक्का वाढला आहे. चार वर्षापूर्वी गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फतच स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेतली जात आहे. या वर्षीचा पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नकताच जाहीर झाला असुन अद्याप गुणवत्ता यादी जाहीर केली नसली तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेला जिल्हाभरातून पाचवीसाठी ८६१२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४८१ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी २९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी हे प्रमाण २७ टक्के होते. त्याचबरोबर गतवर्षी १३० विद्यार्थी यादीत झळकले होते. यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. साधारण १९० च्या आसपास गुणवत्ता यादी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर आठवीसाठी जिल्हाभरातून ४७७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीची तालुकानिहाय टक्केवारी बघता खेड तालुक्यात सर्वाधिक मुले उत्तीर्ण झाली आहेत. खेडमध्ये ३३.३६ टक्के, चिपळूण, लांजा, राजापूर, रत्नागिरी ३१ टक्के, दापोली २६ टक्के, गुहागर २५ टक्के, मंडणगड २३ टक्के, संगमेश्वर २५ टक्के असे प्रमाण आहे. तर आठवीसाठी रत्नागिरी ३३ टक्के, खेड, लांजा २१ टक्के, चिपळूण २२ टक्के, दापोली १६ टक्के, गुहागर ८ टक्के, मंडणगड ११ टक्के, राजापूर १४ टक्के, संगमेश्वर २२ टक्के असे प्रमाण आहे. यावर्षीसुद्धा शिष्यवृत्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव यांनी विविध उपक्रम राबवले. यामध्ये वारंवार चाचणी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले त्याला मोठे यश आले आहे.