रत्नागिरी:- रिफायनरीचे समर्थन करत असतील त्या ठिकाणीच हा प्रकल्प होईल. हे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नाणारचा विषय संपला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी नवीन जागा सुचविण्यात आल्याचे ऐकिवात नसल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नाणार मधील रिफायनरीचा विषय संपलेला आहे. मागील सरकारने उध्दव ठाकरे यांचे ऐकून नाणारमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केला. आता तेच विरोधात असून नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी करत आहेत. हे पूर्णतः चुकीचे आहे. शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासूनच ठाम होती की आम्ही स्थानिकांसोबत राहू आणि म्हणूनच शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी राहिली. स्थानिक जनतेचा या रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. म्हणून रिफायनरी प्रकल्प रद्द झालेला आहे. आता रत्नागिरी विधानसभा मतदरासंघात जयगडला रिफायनरी येतेय किंवा रायगड जिल्ह्यात तळ्याला रिफायनरी होतेय की नाही याबाबत अजुनही माहिती नाही. मात्र रिफायनरीचे समर्थन करणार्या ठिकाणी रिफायनरी होऊ शकते, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. रिफायनरीची जागा ठरेल, तेव्हाच यावर भाष्य करु.