सदोष वीजमीटर रीडिंगद्वारे महावितरण कंपनीची १३ लाख ९४ हजारांची फसवणूक

रत्नागिरी:-सदोष वीजमीटर रीडिंगद्वारे महावितरण कंपनीची १३ लाख ९४ हजार ५४० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मीटर रीडिंग कंत्राटदार विरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भिकाजी फटू कोरगावकर, साई ट्रेडिंग (मद्याचीवाडी, कुडाळ) असे संशयिताचे नाव आहे. वीज बिल देण्याबाबत याआधी ठिकठिकाणी तक्रारी आहेत. आता मीटर रिडिंगमध्ये १३,९४, ५४० रुपयांचे गोलमाल झाले आहे.कंपनीने तक्रार करत याची कबुलीच दिली आहे.

ही घटना जुलै २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत घडली आहे. महावितरणच्या राजापूर उपविभाग १ अंतर्गत वीज ग्राहकांचे मीटर रिडींग व वीजबिल वाटपाचे कंत्राट साई ट्रेडिंग या एजन्सीकडे आहे. कंत्राटदार यांनी वीजग्राहकांच्या मीटर रीडिंग वाचन व वीज बिल वाटप कामी अक्षम्य हयगय केली. मीटर वाचन उपलब्ध असताना मीटर नादुरुस्त, रीडिंग उपलब्ध नाही, घर बंद असे शेरे नोंदवणे, बोगस रीडिंग नोंदवणे अशा प्रकारे महावितरण कंपनीचा १३ लाख ९४ हजार ५४० रुपयांचा महसूल ठप्प केला. महावितरणकडून फेरपडताळणी केल्यानंतर ८९६ वीज ग्राहकांच्या बाबतीत मीटर वाचनात अशा चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदार यांच्याविरुद्ध नेमून दिलेल्या कामात कुचराई करून महावितरण कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला. चुकीच्या मीटर नोंदीमुळे वीज ग्राहकात असंतोष निर्माण होऊन महावितरणची जनमानसातील प्रतिमा डागाळली. तेव्हा या कंत्राटदाराचे कृत्य हे वीज ग्राहकांचीही फसवणूक करणारे आहे. यापूर्वी संबंधित कंत्राटदारास वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊनही कामात सुधारणा झाली नाही. अखेर आर्थिक फसवणू कप्रकरणी महावितरण कंपनीने ३ मार्चला कंत्राटदार कोरगावकर, साई ट्रेडिंग याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस अंमलदार करत आहेत.