रत्नागिरी:- या पूर्वी भाजपची सत्ता असताना येथील अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे टेंडर निघाले होते. त्या नंतर महाविकास आघाडी असताना टेंडर बदलले. कामाचा शुभारंभ झाला मात्र ठेकेदार असोसिएशनने दरवाढ मागितली म्हणून पुन्हा काम रखडले. आता महाविकास आघाडी सरकार पडले त्यामुळे आता फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे हायटेक बसस्थानकाचे काम पुन्हा रखडणार की गतीने सुरु होणार, या बाबत आता प्रवासी वर्गामध्ये उलट-सुलट चर्चा आहे.
गेली 10 वर्षे रत्नागिरी मुख्य हायटेक बसस्थानकाचे स्वप्न साकार होत नाही आहे. तीन वेळा नवीन टेंडर काढले गेले. मात्र, अद्यापही काम सुरु नाही. ठेकेदारांनी कामाचे वाढीव रक्कम मागितल्याने तत्कालीन परिवहन मंत्री यांनी या वाढीव रकमेला मान्यता दिली नव्हती. यातून मार्ग काढण्यात येणार होता. मात्र, यातून अद्याप तोडगा निघाला नाही. आता तर भाजप-शिंदे सरकार आल्याने नेमके हायटेक बसस्थानकाचे काम रखडणार की मार्गी लागणार, याबाबत चर्चा आहे. विशेष म्हणजे राज्यातील 18 बसस्थानकांचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे नवीन सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आताचे टेंडर हे 10 कोटींचे आहे. हे 10 कोटींचे कामाची रक्कम ठेकेदार असोसिएशनने वाढवून मागितली आहे. तीन वर्षांपूर्वी काढलेले टेंडर हे 17 कोटींचे होते. त्या वेळी भाजपचे सरकार होते आता पुन्हा भाजप सत्तेत आलेले आहे. गेली अनेक वर्षे सुसज्ज बसस्थानकाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. यामध्ये प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये मात्र या विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. नवे सरकार या बाबत नव्या सरकारची भूमिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.