रत्नागिरी:- शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी राज्यभर दौरे करत वातावरण निर्मिती करण्यास आरंभ केला आहे. सिंधुदुर्ग आणि रायगडचे दौरे झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा कधी याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांचा जिल्हा दौरा निश्चित झाला असून १६ सप्टेंबरला रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत त्यांच्या सभा होणार आहेत.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनासाठी शिवसैनिक सरसावले असून रत्नागिरी तालुक्याची बैठक रविवारी (ता. ११) दुपारी झाली. रत्नागिरी शहरातील शिवसेनेच्या आठवडा बाजार येथील जिल्हा कार्यालयात शिवसेना उपनेते आमदार डॉ. राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात सकाळी ही यात्रा दाखल होणार असून साळवी स्टॉप येथे सभेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून प्रत्येक जिल्हा परिषद गटातून शिवसैनिकांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यासह विभागप्रमुखांना सुचना दिल्या आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे आदित्य ठाकरे या दौर्यात काय बोलणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या पश्चात चिपळूणचे नेतृत्व कुणाकडे दिले जाणार, रत्नागिरी विधानसभेची जबाबदारी कुणाकडे राहील याबाबत शिवसैनिकांमध्येही उत्सुकता आहे.