चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून यामध्ये वेहेळेमधील सागर विजय गमरे (२६) या कबड्डीपटूचा समावेश आहे. त्याला अधिक उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले आहे.
सागर हा वेहेळे येथून दुचाकीने चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने येत होता. तो सती येथे आला असता त्याची व अन्य एका पाटील नामक व्यक्तीची दुचाकी एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला. सागरसह पाटील नामक व्यक्ती असे दोघेजण गंभीर जखमी झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अखेर त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सागरला सर्वाधिक दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले. सागर हा वेहेळे गावातील सुपरिचित कबड्डीपटू आहे. भीम संघर्ष वेहेळे हा त्याचा स्थानिक संघ आहे. या अपघाताची चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद नसल्याने अधिक माहिती मिळू शकलेली नाही.