रत्नागिरी:- क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अद्वितीय खेळाने जगभरातील कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर आज अचानक गणपतीपुळे येथे आले. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भेट देऊन त्यांनी श्री गणरायाचे अत्यंत श्रद्धेने आणि भावूक वातावरणात दर्शन घेतले. मास्टर ब्लास्टरच्या या अनपेक्षित भेटीमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गणपतीपुळे मंदिरात आगमन झाल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी श्री गणरायाची शास्त्रीय परंपरेनुसार विधिवत पूजा केली आणि देवाला साकडे घातले. या प्रसंगी गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी त्यांना श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचा इतिहास, पावित्र्य आणि श्री गणपती मंदिराची विशेष महती सांगून त्यांचा सत्कार केला.
क्रिकेटचा देव मानला जाणारा अवलिया स्वतः देवाच्या दरबारात लीन झाल्याचे दृश्य उपस्थितांसाठी अत्यंत भावूक आणि अविस्मरणीय ठरले. सचिन यांच्या आगमनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक, भाविक आणि क्रिकेटप्रेमींनी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती. सचिन तेंडुलकर यांच्या या अध्यात्मिक आणि अचानक झालेल्या दौऱ्यामुळे गणपतीपुळे परिसरात आणि स्थानिक चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.









