आंबा बागायतदार; 25 मे च्या दौर्यावेळी भेट घेणार
रत्नागिरी:- हापूसवरील किड रोगांना नियंत्रण ठेवणारी प्रभावी औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा रत्नागिरीमध्ये व्हावी यासाठी येथील आंबा बागायतदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार आहेत. मुख्यमंत्री 25 मे रोजी रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. त्यावेळी भेट घेण्याचा प्रयत्न बागायतदार करणार आहेत.
वातावरणातील बदलांमुळे यंदा हापूसचे पिक अल्प होते. सध्या शेवटच्या टप्प्यातील हंगाम सुरु आहे. पुढील आठ दिवसांमध्ये हंगामाची अखेर होईल असे बागायतदारांनी सांगितले. थ्रिप्स रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना महागडी औषधे वापरावी लागली. काही बागायतदारांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे ऐन हंगामात हापूस डागाळला होता. तो बाजारात पाठवणे शक्य नसल्याने कॅनिंगशिवाय पर्याय नव्हता. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे पेटीचे दर उच्चांकी होते. कॅनिंगसाठीही आंबा कमी उपलब्ध होता. थ्रिप्ससह अन्य रोगांना आळा घालण्यासाठी आवश्यक संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा रत्नागिरीत सुरु करणे आवश्यक आहे. सध्या आंब्यावर वापरणारी औषधे ही अन्य पिकांसाठी वापरली जातात. त्यादृष्टीने संशोधन झाले आहे. संशोधन केंद्राची सुरु करण्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बागायतदार भेट घेणार आहे. दोन दिवसात पुन्हा आंबा बागायतदारांनी बैठक होणार आहे. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे. कर्नाटकी आंबा हापूसच्या नावाने विकणार्यांवर कारवाईसाठीही शासनाने पावले उचलावीत अशी मागणी केली जाणार आहे. यंदा उत्पादन कमी आल्यामुळे बागायतदार कर्जात डुबणार आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदत द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
त्या विक्रेत्यांना बसला चाप
हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा विकणार्या रत्नागिरीतील विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी स्थानिक आंबा बागायतदारांनी राबवलेल्या धडक मोहिमेला काही प्रमाणात यश आले आहे. कर्नाटकमधून आंबा आणून तो रत्नागिरी हापूस नाव असलेल्या बॉक्समध्ये भरून पाठवत होते. या प्रकाराला आळा बसल्याचा विश्वास बागायतदार निशांत सावंत यांनी व्यक्त केला.









