रत्नागिरी:- एसटी कामगारांच्या काम बंद आंदोलनावर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीपर्यंत तोडगा निघू शकला नाही. कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबित कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. राज्यभरात प्रशासनाने कडक कारवाईचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, एसटी बंदचा फटका शुक्रवारी पावसला स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाला जाणाऱ्या भक्तांना बसला होता. रत्नागिरी आगाराने दिवसभरात ४ फेऱ्या सोडल्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. या गाडीने ७५ हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला व त्यामुळे सुमारे दोन हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. बरेच दिवस रत्नागिरी एसटी आगारातून वाहतूक बंद होती. तीन दिवसांपासून वाहतूक सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरला स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवासाठी जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पावसला चार फेऱ्या सोडण्यात आल्या. कोरोना महामारीच्या काळात वाहतूक सुरू असताना रत्नागिरी एसटी विभागातून २ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. परंतु आजच्या घडीला सुमारे १७ हजार प्रवासी करत आहेत. यातून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईच्या प्रक्रियेला सुरवात झाल्यामुळे पुढील महिन्याभरात ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आज दापोली ४३, खेड १२, चिपळूण २६, गुहागर १, देवरूख ४६, रत्नागिरी ग्रामीण २, रत्नागिरी शहर ००, लांजा ४, राजापूर २१, मंडणगड ०० अशा १५५ फेऱ्या सोडण्यात आल्या. यातून सुमारे १६ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.
रत्नागिरीत कृती समिती नाही
रत्नागिरी एसटी विभागातील सर्व कामगारांनी एकत्र येऊन काम बंद आंदोलन चालू केल्यानंतर आज ५३ दिवस झाले. तरीही कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. आम्ही दुखवट्यात आहोत, असे कामगार सांगत आहेत तसेच राज्यभरात सर्व संघटनांची एकत्रित अशी कृती समिती होती. परंतु रत्नागिरीमध्ये अशी कृती समिती कार्यरत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. येथे सर्व प्रतिनिधी आणि कामगार मिळून आंदोलन करण्यात येत आहे.