रत्नागिरी:- जिल्ह्यात संचारबंदी कडक करण्यात आल्यानंतर तब्बल पाच हजार वाहने तपासण्यात आली. यात विनाकारण फिरणार्यांकडून सुमारे पाच लाखाचा दंड वसूल करण्यात आला. तर या दरम्यान जिल्ह्यात सुमारे 560 जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये 31 कोरोबाधित सापडले आहेत. मास्क न वापरणार्यांकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला.
राज्य शासनाकडून गेल्या दोन दिवसापासून संचारबंदी कडक करण्यात आली आहे. जिल्ह्यातही महसूल व पोलीस यंत्रणेकडून संचारबंदीची अंमलबजावणी जोरात सुरु आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरणार्यांविरोधात जोरदार मोहिम गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. जिल्ह्यात 83 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दोन दिवसात पाच हजार वाहने तपासण्यात आली. यावेळी 10 हजार लोकांचीही चौकशी करण्यात आली.
विनाकारण फिरणार्या 1776 वाहनचालकांकडून तब्बल 4 लाख 99 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न वापरणार्या 296 व्यक्तींना 1 लाख 51 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पोलिसांनी विनाकारण फिरणार्या 6 जणांची वाहने जप्त केली आहेत. तर एकावर कोव्हीड नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात सुमारे 560 जणांची तपासणी करण्यात आली. यात 31 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
संचारबंदीची अंमलबजावणी कडक व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग हे रेल्वेस्थानक फाटा व मारुती मंदिर येथे स्वत: नाकाबंदीसाठी कर्मचार्यांसोबत उभे राहून मार्गदर्शन करीत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक डिवायएसपींना नाकाबंदीसाठी वेळ नेमून देण्यात आली आहे. स्वत: पोलीस निरीक्षक नाकाबंदी करीत असून विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करीत आहेत.