देवरूख:- संगमेश्वर पोलीस निरीक्षकपदी नीलकंठ बगळे यांची नियुक्ती झाली असुन देवरूख पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती झाली आहे. दोघांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. देवरूख , संगमेश्वर मध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर आपला भर असेल असे त्यानी सांगितले.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये संगमेश्वर, देवरूख पोलीस ठाण्याच्य निरीक्षकांची बदली करण्यात आली. सुरेश गावित यांची सिंधुदुर्ग मध्ये बदली झाली त्यांच्या जागी नीलकंठ बगळे यांची नियुक्ती झाली आहे तर देवरूखचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची सिंधुदुर्गात बदली झाल्याने त्यांच्याजागी अमित यादव यांची नियुक्ती झाली आहे.
अमित यादव हे मुळचे कोल्हापूर येथील आहेत. त्यांनी आपल्या पोलीस सेवेची सुरूवात नांदेड येथून केली आहे. नांदेड येथे त्यांनी उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेला सुरूवात केली. याठिकाणी सेवा केल्यानंतर मुंबई येथे त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती झाली. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून बढती झाली. याठिकाणी त्यांनी वैभववाडी, ओरोस, कणकवली येथे तीन वर्षे चांगल्याप्रकारे सेवा केली. पदभार स्विकारताच सर्व कर्मचार्यांना सोबत घेऊन आपण काम करणार असून देवरूखात कायदा‚ सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.