संगमेश्वर शास्त्री पूल ते नायरी रस्ता डागडुजी न झाल्यास उपोषण

संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री पूल ते नायरी रस्ता पूर्णतः खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. गेली अनेक वर्ष या रस्त्याची फार दुरवस्था झाली आहे. प्रत्येक वेळी आश्वासनाव्यतिरिक्त ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असल्याने नायरी परिसरातील दहा गावातील ग्रामस्थानी 26 जानेवारी रोजी फणसवणे नाक्यात पक्ष विरहित आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला असून तसे निवेदन रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री पुल ते नायरी तिवरे, निवळी नेरदवाडी मार्ग हा सुमारे अठरा ते वीस किलोमीटरचा असुन या मार्गाची फारच दयनीय अवस्था झाली आहे. त्यामधे शास्त्रीपूल ते फणसवणे पूर्णतः उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. साईड पट्ट्या तर एक ते दीड फुटाने खचल्या असल्याने समोरून वाहन आल्यास दुचाकी किंवा रिक्षा यांना खाली उतरायचे म्हटल्यास गाडीच्या चेसला दणका बसून वाहन पलटी होण्याचीच शक्यता असते.काही काही वेळा असे अपघात ही झाले आहेत. येथील ग्रामस्थानी संबंधित विभागाकडे अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या पावसाळ्या पुर्वी तर ग्रामस्थानी पक्ष विरहित उपोषण देखील केले. मात्र एक महिन्याच्या आत कामाला सुरुवात करु या लेखी आश्वासनाला बळी पडून आंदोलन मागे घेण्यात आले होते.मात्र बांधकाम विभागाने लेखी आश्वासन देऊन आठ महिने होऊन गेले तरी ना या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली की ना या मार्गावरील खड्डे वा साईड पट्ट्या भरल्या गेल्या. या संबधी बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता कधी निधी नाही, कधी निधी मंजुर आहे, पण निविदा निघायच्या आहेत, तर कधी आठ दिवसात कामाला सुरुवात होणार आहे, अशी दिशाभूल करणारी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेवटी फणसवणे, कोंड उमरे, कारभाटले, नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातूर्डी, निवळी आणि नेरद आदी सुमारे दहा गावच्या ग्रामस्थांनी येत्या 26 जानेवारीला फणसवणे नाका या ठिकाणी जो पर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होतानाही तोवर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असून तसे लेखी निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आले आहे,संबंधित निवेदनाच्या माहितीसाठी प्रति आमदार शेखर निकम, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी, जिल्हापोलीस अधीक्षक रत्नागिरी, तहसीलदार देवरुख, संगमेश्वर, पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आठ दिवसात सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास आम्ही कोविड 19 च्या अधिनियमाचे काटेकोर पालन करून पुरेशी खबरदारी घेत आमरण उपोषणास बसत असल्याचा उल्लेख करण्यात आला असून त्यावर ग्रामस्थ्यांच्या सह्या आहेत.