संगमेश्वर बाजारपेठेत पूरसदृश परिस्थिती

संगमेश्वर:- सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांत पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झाले आहे, तर दुकानदारांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रामपेठ बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे.यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक दुकानदारांनी तातडीने दुकानांमधील वस्तू आणि महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.

या पूरस्थितीचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नाही, तर स्थानिक रहदारीवरही झाला आहे. रामपे,कोंडआसुर्डे, मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून, आवश्यकतेनुसार मदतकार्य सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.